काही दिवसांपूर्वी शहरापासून अगदी काही अंतरावरील एका निर्जनस्थळी प्रेमीयुगलांचा राबता वाढला आहे. या परिसरात काही लुटारूंनी एका तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबविली होती. लुटारूने सोनसाखळी पळविली असली तरी अशा निर्जनस्थळी काही आंबटशौकीन मुलींना एकटीला हेरून अनुचित प्रकार करण्याची भीतीही व्यक्त होत आहे. शाळा-महाविद्यालयात जाण्याच्या बहाण्याने पुस्तकांची बॅग पाठीला टांगून भरधाव दुचाकीवरून निर्जनस्थळ गाठण्याची जणू तरुण-तरुणींमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे.
स्कार्फ आणि मास्कमुळे चेहरा ओळखण्याचा प्रश्नच येत नाहीत. त्याचाच फायदा हे प्रेमीयुगुल घेत असल्याचेही दिसून येते. ब्रह्मपुरी शहरातून दूधवाहीकडे जाणारा मार्ग, आसपासचा परिसर, मालडोंगरीवरून धामणगावकडे जाणाऱ्या मार्गावरील कालवा, ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावरील जंगलव्याप्त परिसराला लागून असलेले मैदान, उद्यान आदी ठिकाणी प्रेमीयुगलांचा वावर चांगलाच वाढला आहे.