राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’; श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन, शिकवणुकीवर थीम
By साईनाथ कुचनकार | Published: January 19, 2024 04:19 PM2024-01-19T16:19:08+5:302024-01-19T16:20:36+5:30
राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे.
साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : विद्यार्थ्यांना वाचणाची, लिहिण्याची आवड निर्माण व्हावी सोबतच महान व्यक्तींचा इतिहास कळावा यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राज्यभरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक' ही थिम राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यावर विद्यार्थ्यांना लिहायचे आहे.
महावाचन उत्सवामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करावा लागणार आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे लेखन जमा करायचे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे.