बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८० तीर्थक्षेत्र आहेत. यातील कित्येक तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा प्राप्त आहे. बल्लारपूर तालुक्यातील काेठारी येथील महिपाल बाबा टेकडी व जिवती तालुक्यातील मराई पाटण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी विसापूर-बामणी जि. प. क्षेत्राचे सदस्य व भाजपा अनुसूचित जमाती माेर्चा जिल्हा अध्यक्ष ॲड.हरीश गेडाम यांनी केली आहे.
जिल्हा वार्षिक याेजनेंतर्गत यात्रा स्थळे व तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपाययोजना करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सन २०२०-२१ तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी निधी वितरित करण्याचे नियोजन केले आहे. काेठारी येथील महिपाल बाबा टेकडीवर दरवर्षी माेठी यात्रा आयोजित केली जाते. या ठिकाणी आवश्यक साेईसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होते. जिवती तालुक्यातील मराई पाटण तीर्थक्षेत्र आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे. अन्य भाविकही दर्शनासाठी माेठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. जिल्ह्यातील भाविकांसह शेजारच्या तेलंगणा राज्यातील भाविक दर्शनासाठी मराई पाटण तीर्थस्थळी येऊन मनाेभावे पूजा-अर्चना करतात. येथेही भाविकांना साेईसुविधा उपलब्ध नसल्याने अडचणीला सामाेरे जावे लागते. जिल्हा वार्षिक याेजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर करून देण्याची मागणी ॲड.हरीश गेडाम यांनी केली आहे.