सिंदेवाही : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. गुरुवारी प्रचार संपला असला तरी महिला उमेदवारांना मकरसंक्रांतीची आयतीच संधी मिळाली आहे. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत महिला उमेदवारांनी गुरुवारी चांगलाच गुप्त प्रचार केला.
प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतीकरिता महिला उमेदवार रिंगणात उभ्या आहेत. प्रचार कालावधी संपला असून शेवटच्या दिवसाला गुप्त प्रचाराद्वारे प्रत्येक वॉर्डातील महिला उमेदवारांनी मतदारांच्या घरी भेटी देणे सुरू केले आहे. १५ जानेवारीला मतदान असल्याने आजचा शेवटचा दिवस हा अंतिम टप्पा महत्त्वाचा असल्याने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रचाराचा एक नवीन प्रकार पहावयास मिळत आहे. प्रत्येक घरी महिला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूसाठी भेटी देत असून तीळ गूळ आवर्जून देत गोड बोलण्याची विनंती करीत आहेत.