अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:44+5:302021-02-24T04:30:44+5:30
प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी राजूरा : शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत ...
प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी
राजूरा : शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पण नागरी समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधांचा अभाव
वरोरा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़. तालुक्यातील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़. कुटुंबाच्या गरजा भागविताना मोठी ओढाताण होत आहे़. त्यामुळे आरोग्यासाठी खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़.
रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील चांदा फोर्ट रेल्वेस्थानक परिसरात कचरा साचला आहे. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी चंद्रपूर शहरातील नागरिकांनी केली आहे़
वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही
चंद्रपूर : येथील पडोली परिसरात विविध साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहे. या ट्रकचालकांच्या वेगावर नियंत्रण आणावे व भरधाव ट्रक चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
फुटपाथ केले गिळंकृत
वरोरा : येथील महामार्गावरील मुख्य रोडच्या दोनही बाजूच्या पार्किंग रोडवर हॉटेल व्यावसायिक किराणा, जनरल हॉर्डवेअर, पानटपरी, चहाटपरी, वेलडिंग वर्क शॉपवाले व काही घर मालकांनीही अापले बसस्थान मांडले आहे. तसेच रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
डुकरांमुळे पिकांचे नुकसान
चंद्रपूर : जंगल परिसरातील पिकांची रानडुकरांकडून प्रचंड नासधुस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील विविध प्रभागात मागील काही दिवसांपासून सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने अनेक उपकरणे बंद चालू होत असतात. तर काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. याबाबत येथील नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केली आहे. मात्र वीज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष होत आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
चंद्रपूर: केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरिब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.
खड्यांचे साम्राज्य
सावली : सावली तालुक्यातील उपरी ते भान्सी-पेठगाव अनेक गावांत रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
वाहन पार्किंगसाठी फुटपाथचा वापर
चंद्रपूर : येथील महात्मा गांधी ते पठाणपुरा गेटपर्यंत फुटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुक पोलीस शाखा आणि मनपाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालावी
चंद्रपूर : दुर्गापूर मार्गावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील अन्य मार्गांवरही सर्रास सुरू आहे. जड वाहतूकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दुर्गापूर परिसरातील काही भागांत सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. त्यामुळे कंत्राटदार ट्रकांद्वारे ओव्हरलोड वाळू व मुरुम वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.
अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयामध्ये आजही अस्वच्छता आहे. विशेष म्हणजे, अस्वच्छता करणाऱ्यावर अद्यापपर्यंत कोणताही कारवाई झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात.
प्लास्टिकने जनावरांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. येथील अनेक वॉर्डातील दुकानांमध्ये व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही पिशव्या देण्यात येतात. या पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले. शिवाय, शहरातील वातावरण प्रदुषित होत आहे.
प्रवासी निवाऱ्याची मागणी
कोरपना : कोरपना- आदिलाबाद महामार्ग वरील कोठोडा फाट्यावर प्रवाशी निवारा नाही. त्यामुळे प्रवाश्यांना रस्त्यावरच उभे राहून बस पकडावी लागते. येथे त्वरीत प्रवाशी निवारा बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.