विसापूर : जिल्ह्यात काेराेना संक्रमणाची दुसरी लाट विक्राळ रूप धारण करीत आहे. या लाटेला थाेपविण्यासाठी आरोग्य विभाग आटाेकाट प्रयत्न करत आहे. मात्र, आरोग्य सेवा ताेकडी पडत आहे. परिणामी जनता जीव वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे. यावर उपाय म्हणून काेविड लसीकरण माेहीम सुरू केली आहे. मात्र, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच लसीकरण केंद्रावर ऑनलाइन नाेंदणी केलेल्या लाभार्थींना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना लसीकरण माेहिमेपासून वंचित राहावे लागत आहे.
यावर उपाययोजना म्हणून लसीकरण केंद्रावर ऑनलाइन नाेंदणी केलेल्या लाभार्थींना वेगळे व सामान्य नागरिकांना वेगळे लसीकरण केंद्र निर्माण करावे. शतप्रतिशत लसीकरण माेहीम यशस्वी करावी, अशी मागणी विसापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
काेराेना विषाणूचा दुसऱ्या टप्प्यातील प्रकाेप कमी करण्यासाठी व काेराेना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी काेविड लसीकरण माेहीम सुरू झाली आहे. यासाठी बल्लारपूर तालुक्यात ११ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लसीकरण माेहिमेत सहभागी करण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. मात्र, लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण माेहीम अद्याप अर्धवट आहे. अनेक लाभार्थींना लसींचा दुसरा डाेस शिल्लक आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांना लसीकरण माेहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. ६० व ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेविड लसीकरण व १ मेपासून सुरू हाेणारे १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण धांदल निर्माण करणारे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच सतर्क हाेऊन ऑनलाइन नाेंदणी केलेल्या लाभार्थींना लसीचा डाेस घेण्यासाठी दुसरे व सामान्य नाेंदणी केलेल्या लाभार्थींना लसीचा डाेस घेण्यासाठी वेगळे लसीकरण केंद्र निर्माण करून नागरिकांना लसीकरण माेहिमेत सहभागी करावे, अशी मागणी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केली आहे.