मार्शल प्लॅन घेऊन शेतकरी संघटना पुन्हा मैदानात
By admin | Published: April 14, 2015 01:09 AM2015-04-14T01:09:42+5:302015-04-14T01:09:42+5:30
सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात
राज्यभर दौरे : देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा
चंद्रपूर : सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात उतरली आहे. या अंतर्गत राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आणि देशव्यापी आंदोलन उभारण्याचे नियोजनही शेतकरी संघटनेने केले आहे.
शेतकरी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी सोमवारी चंद्रपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मार्शल प्लॅन जाहीर केला. यावेळी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंबरडेकर, राज्य महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, प्रांताध्यक्ष अॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. मार्शल प्लॅन संदर्भात माहिती देताना गुणवंत पाटील हंबरडेकर म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे अर्थात कर्ज व वीज बिल संपविणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा पतपुरवठा करणे आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन मालाला रास्त भाव सरकारने जाहीर करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा हा मार्शल प्लॅन आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने स्वातंत्र देऊन त्यांच्या जीवनमानातील हस्तक्षेप सरकारने संपवायला हवा. देशावर झालेले कर्ज सरकारच्या चुकीमुळे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र शेतकरी सहन करीत आहेत. सरकारने कर्जमाफी देतानाही सावकाराचेच भले कसे होईल, याचाच अधिक विचार केला. सावकारांना वैध करून त्यांना पैसा वाटण्याचे काम या सरकारने केल्याने सावकारांचे व या सरकारचे लागेबांधे असल्याची शंका येते, असेही ते म्हणाले.
नव्या सरकारच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र धर्मकारणावरच अधिक चर्चा रंगलेली दिसते. हे सरकार उद्योपतींच्या हितरक्षणासाठीच काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ते म्हणाले.
अॅड. चटप म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गावातील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना विकासाचा शब्द दिला होता.
मात्र सत्तेत आलेल्या त्यांच्याच सरकारातील मंत्री नितीन गडकरी यांनी, शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे जाहीर भाष्य करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शेतकऱ्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीव्यवसाय धोक्यात आणून उद्योगपतींच्या हितरक्षासाठी धावणारे हे सरकार असल्याचा आरोही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला रामराव कोंडेकर, प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अरविंद गाठे, श्रीधर बलकी, दिवाकर माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)