दालमिया सिमेंट कंपनी मध्ये भीषण आग, तीन कन्वेयर बेल्ट जाळून खाक
By राजेश भोजेकर | Published: August 11, 2023 04:29 PM2023-08-11T16:29:16+5:302023-08-11T16:30:52+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नावजेलेली कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या दालमिया सिमेंट कंपनीमध्ये शुक्रवारी पहाटे सिमेंट मिलजवळ भीषण आग लागल्याने तीन कॅन्वेअर बेल्ट जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग कन्वेअर बेल्ट व्यतिरिक्त इतरत्र पसरली नसल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
कोरपना तालुक्यातील नारंडा स्थित दालमिया कंपनीमध्ये पहाटे ५ वाजताच्यादरम्यान कंपनी परिसरातील सिमेंट मिल जवळ असलेल्या सिमेंट पास करणाऱ्या बेल्टला आग लागली. बेल्ट चालू असल्याने आगीची भिषणता वाढत गेली. त्यामुळे कन्वेयर बेल्ट १, २ व ३ हे तिनही बेल्ट जळून खाक झाल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी नुसार बेल्ट चालू असल्याने घासला गेला त्यामुळे ही आग लागल्याची सांगण्यात येत आहे.
कंपनी प्रशासनाने सावधगिरी बाळगत आपल्या कंपनीतील फायर ब्रिगेडच्या वतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले परंतू आगीची तीव्रता अधिक असल्याने अल्ट्राटेक, माणिकगड, अंबुजा येथील फायर ब्रिगेड यांना पाचारण करून आगीवर नियंत्रन मिळविले.
सिमेंट कंपनीतील कामगाराची शिफ्ट सकाळी ६ वाजता व नंतर जनरल ८.३० वाजता सुरू होते. त्यामुळे कामगाराची संख्या अधिक नव्हती व जवळपास काम करणारे कामगार यायचे असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
पहाटे ५ वाजताच्या दरम्यान कंपनीमध्ये सिमेंट वाहतूक करणाऱ्या कन्व्हेअर बेल्टला आग लागली होती. मात्र त्वरित आग विझवून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली. कोणतीही जीवितहानी झाली नाही व त्यामुळे कंपनीला कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.
- अभिषेक मिश्रा, एच.आर. विभाग प्रमुख, दालमिया सिमेंट, नारंडा