सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा
By राजेश भोजेकर | Published: April 4, 2023 01:12 PM2023-04-04T13:12:26+5:302023-04-04T13:13:12+5:30
सर्व सफाई कामगार लागले सफाईच्या कामाला
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सफाईची कामे करणाऱ्या सुमारे २०६ सफाई कंत्राटी कामगारांना कंत्राटदार कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. या कार्यवाहीने आता आपल्या कुटुंबांचे पालन पोषण कसे करायचे, असा यक्षप्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकला होता. ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आली. त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष देत तोडगा काढल्याने या कामागारांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मागील काही दिवसांपासून या कामगारांनी कामावरून कमी करण्याच्या विरोधात सफाईची कामे बंद केली होती. यामुळे चंद्रपूर शहरात अनेक भागातील कचराकुंड्यांमध्ये कचरा गोळा झाला होता. शहराची स्वच्छता वेठीस धरल्यागत स्थिती निर्माण झाली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माजी उपमहापौर राहुल पावडे यांना सफाई कंत्राटी कामगारांसोबत थेट चर्चा करायला सांगितले. या चर्चेतून त्यांनी एकाही कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार नाही, अशी ग्वाही कामगार द्यायला सांगितली. आणि या ग्वाहीनंतर सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता आपल्याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचा दिलासा त्यांना मिळाला. अखेर आजपासून या कंत्राटी कामगारांनी सफाईच्या कामाला हात लावला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून आम्ही कामावर जात नव्हतो. आम्हाला कामावरच घेतले जात नव्हते. यामुळे आमच्या कुटुंबियांची मोठी उपासमार होत होती. आमच्या या गंभीर प्रश्नावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल पावडे यांच्या माध्यमातून बैठक बोलावली आणि आमचा प्रश्न निकाली काढला. आजपासून जवळपास सर्वच २६० कंत्राटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. १६० जणांना सफाई कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेणार आहेत तर उर्वरित कामगारांना महानगरपालिकेची अन्य कामे दिली जाणार आहेत. यामुळे कोणीही कमी होणार नाही, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने आमचा प्रश्न आता सुटला आहे.