कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:37+5:302021-05-24T04:27:37+5:30

नागभीड तालुक्यात सुविधांची होत आहे उपलब्धता : पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग अधिक घनश्याम नवघडे नागभीड : कोरोनाच्या पहिल्या ...

Medical department ready for third wave of corona | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय विभाग सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय विभाग सज्ज

Next

नागभीड तालुक्यात सुविधांची होत आहे उपलब्धता : पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग अधिक

घनश्याम नवघडे

नागभीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ग्रामीण भागासाठी तीव्र राहिली. त्यामुळे प्रशासन अलर्ट होऊन ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा पुरविण्याकडे लक्ष देत आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना केलेला नागभीड येथील वैद्यकीय विभाग तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. वैद्यकीय सोयी सुविधांची उपलब्धताही होत आहे. लोकही जागृत होत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जरी आली तरी तिचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग आधीच सज्ज आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची सुरुवात २३ मार्च २०२० पासून केली. मात्र, नागभीड व नागभीड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ जून रोजी मिळाला. त्यानंतर नागभीड तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. फेब्रुवारी २० पर्यंत ९०५ रुग्ण या तालुक्यात आढळून आले होते. ही पहिली लाट असल्यामुळे येथे वैद्यकीय सुविधांची वानवा होती. पॉझिटिव्ह रुग्णास सरळ चंद्रपूर येथे रेफर करावे लागत होते. स्टाफही कमी होता. या पहिल्या लाटेत मृत्यू पावलेल्यांमध्ये वृद्ध व्यक्तींचे प्रमाण अधिक होते.

मात्र, दुसऱ्या लाटेने भयावह स्थिती निर्माण केली. मृत्यू प्रमाण तर वाढलेच, पण यात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली. १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत १ हजार ७६९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बॉक्स

नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

यात दिलासादायक बाब ही की, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून नवीन कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांस स्थानिक पातळीवरच उपचाराच्या सोयी निर्माण झाल्या.

बॉक्स

अशा वाढल्या सुविधा

ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर मिळाले, वाहने मिळाली. यामुळेच दुसऱ्या लाटेचा सामना करणे सहज शक्य झाले.

संभाव्य तिसऱ्या लाटेचाही सामना करण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे. नागभीडचाच विचार करता येथे १३० बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यात ३० ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. सध्या ३० काॅन्सेंट्रेटर ,५० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. कर्मचारीवर्गही पुरेसा आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जरी आली तरी फार परिणाम जाणवणार नाही.

बॉक्स

ऑक्सिजन प्लांटची गरज

संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नागभीड येथे ऑक्सिजन प्लांटची गरज आहे. सध्या नागभीडला चंद्रपूर येथून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यात बराच वेळ आणि आर्थिक भार पडत आहे. हे नुकसान टाळायचे असेल तर याठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आहे. यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. नागभीड हे मध्यवर्ती स्थान असल्याने येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला, तर त्याचा फायदा आजूबाजूच्या अन्य तीन चार तालुक्यांनाही होऊ शकतो. हे तालुकेही चंद्रपूरऐवजी नागभीड येथून ऑक्सिजनची उचल करू शकतात.

बॉक्स

कोरोनाने किमान ५० मृत्यू

नागभीडच्या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत १५ व्यक्ती मृत पावल्या आहेत. यात पहिल्या लाटेत चार, तर दुसऱ्या लाटेत ११ व्यक्ती आहेत. मात्र, अनेक कोरोनाबाधित व्यक्ती या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व अन्य ठिकाणी मृत पावल्या आहेत. काहींनी तर घरीच प्राण सोडला आहे. अशा एकंदर मृत्यूंचा विचार केला तर हा आकडा ५० पर्यंत असावा, असा अंदाज आहे.

कोट

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. सुविधा निर्माण झाल्या आहेत. लोकही जागृत झाले आहेत.

- डाॅ. विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, नागभीड.

Web Title: Medical department ready for third wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.