चंद्रपूर : बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वन विभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून, त्याची प्रकृती चांगली असल्याचे वन विभागाने एका प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
१४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र चिमूर (प्रादेशिक) परिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतामध्ये टी-१२६ म्हणजेच छोटा मटका आणि टी-४४ म्हणजे बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती. या झुंजीत बजरंग या वाघाचा मृत्यू झाला. यानंतर छोटा मटकाही गंभीर जखमी असावा, असा संशय होता. मात्र, तो दिसत नव्हता.
अखेर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक व उपसंचालक (बफर) यांच्या आदेशान्वये दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, यांच्यासोबत क्षेत्र सहायक निमढेला बी. आर. रंगारी, क्षेत्र सहायक आर. जे. गेडाम, खडसंगीचे वनरक्षक जी. एम. हिंगणकर, वनरक्षक निखिल बोडे, वनरक्षक संतोष लोखंडे, वनरक्षक चेतन कोटेवार तसेच एसटीपीएफ व पीआरटी कर्मचारी, कुटी मजूर, रोजंदारी मजूर, अलिझंजा व निमढेला निसर्ग पर्यटन गेटवरील गाईड, जिप्सी चालक मालक अशा एकूण ६५ वन कर्मचाऱ्यांनी पायी गस्त केली.
चिंता दूर झाली, छायाचित्र जारी...
छोटा मटका दिसत नसल्यामुळे पर्यटकांमध्ये त्याच्याविषयी चिंतेचे वातावरण होते. आता ही चिंता दूर झाली आहे. त्यांचे छायाचित्रही जारी करण्यात आले आहे. बजरंगचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून कक्ष क्र. ५७ व कक्ष क्र. ५५ मध्ये एकूण १५ ट्रॅप कॅमेरे लावून झुंजीमध्ये जखमी झालेला छोटा मटका या वाघाचा शोध घेतला असता, या वाघाच्या शरीरावर किरकोळ जखमा असून, त्याची प्रकृती चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून आल्याचे वन विभागाने म्हटले आहे.