कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:23+5:30
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता.
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे कार्यालय एक तर नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे स्थापित करावे नाही तर, चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला. तर काही शेतकऱ्यांनी स्विकारला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्यांना ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर या शेतकऱ्यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला.
आता या शेतकऱ्यांनी पाठपुरावा करायचा म्हटले तर गोंडपिपरीलाच जावे लागणार आहे. वास्तविक हे कार्यालय पूर्वी चंद्रपूर येथे असल्याने मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे जाऊन पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय आता गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले कार्यालय शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक छळ करणारे कार्यालय ठरत आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.
गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले हे कार्यालय नागभीड तालुक्यासाठी गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे.नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे या कार्यालयाची स्थापना करावी नाही तर चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करणे काळाची गरज झाली आहे.
-गोपाल शिवणकर ,
पीडित शेतकरी, मिंथूर.