बल्लारपूर : कोविडकाळात शहरातील नागरिकांनी वेगवेगळ्या पॅथीची औषधी घेऊन कोरोना महामारीशी संघर्ष केला. यात होमिओपॅथीची औषधी ही अनेकांच्या कामी आली. मागील अनेक वर्षांपासून शहरात होमिओपॅथी दवाखाना नव्हता, ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने बल्लारपूरच्या नागरिकांसाठी होमिओपॅथी दवाखाना सुरू केला आहे.
या दवाखान्याचे उद्घाटन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत चंदनसिंग चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. होमिओपॅथी डॉ. सुनील पाकडे उपस्थित होते. हा दवाखाना टेकडी विभागातील फुलसिंग नाईक वॉर्डात सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यात अत्याधुनिक तंत्रप्रणाली, संगणक प्रणाली व सर्वसंपन्न सोयी आहेत. रविवार वगळता रोज सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत दवाखाना सुरू राहणार आहे. वस्ती विभागात नागरिकांसाठी आयुर्वेदिक दवाखाना आहे. आता आणखी एका दवाखान्याची भर पडली आहे. होमिओपॅथी ही एक शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक तत्त्वप्रणालीवर आधारलेली उपचार पद्धती असल्यामुळे शहरातील नागरिकांनी औषधींचा नि:शुल्क लाभ घेऊन झालेल्या आजारांचे निदान करावे, असे आवाहन याप्रसंगी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.