ब्रह्मपुरी : शहरातील मुख्य चौक, रस्त्यावरील अतिक्रमणाविरूद्ध ब्रह्मपुरी नगरपरिषदेने १३ जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सलग पाचव्या दिवशी नगरपरिषदेची ही मोहीम सुरूच आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत, तर शहरातील मुख्य चौकांनी व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता. त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी १३ जानेवारीपासून अतिक्रमणधारकांविरूद्ध विशेष मोहीम हाती घेतली.
मागील पाच दिवसांत ब्रह्मपुरीतील शिवाजी चौक, ख्रिस्तानंद चौक, खोब्रागडे चौक, बाजारपेठ परिसरात बुलडोझरच्या साहाय्याने मुख्याधिकारी अर्शिया जुही, ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईने अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले असून, स्वत:च अतिक्रमण हटविताना दिसून येत आहेत. ही मोहीम मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्त्वात मंगेश बोंड्रे, मनोज अंबोरकर, नूतन कोरडे, उत्कर्षा माकोडे, दिलीप चिले, धर्वे, हटवार, इंदूरकर यांच्यासह ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
ज्यांनी शहरातील रस्त्यावर अतिक्रमण केले असेल, त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे किंवा ज्याचे अतिक्रमण हटविले आहे. त्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करावे तसेच शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. -अर्शिया जुही, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी