लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : निसर्ग संपन्न असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकासापासून अद्यापही वंचितच आहे. त्यामुळे दोन्ही तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित करून पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.एकीकडे माणिकगडचे उंच उंच पहाड तर दुसरीकडे वैनगंगा, वर्धा नदीचे निर्मल सान्निध्य लाभलेल्या या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी सर्वदूर परिचित आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे, जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा आदी तर जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला, पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे. मात्र, माणिकगड किल्ला वगळता एकाही स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला नाही.यामध्ये वनसडी, पारडी येथील निजाम कालीन इन्स्पेक्शन बंगले, कोळशी बु. येथील निजामकालीन नाका, शेरज बु. येथील पोलीस ठाण्याची वास्तू, रूपापेठ, दुर्गाडी, चनई येथील गोंडकालीन गढी, कारवाही येथील गुफा, शंकरलोधी येथील गुफा आदी स्थळेही पर्यटनासाठी चांगली आहेत.
स्थानिकांना रोजगार तर वनविभागाला मिळणार उत्पन्नत्यामुळे ही स्थळे अनेक सोयी-सुविधापासून वंचित आहे. यातील बरचशी स्थळे वन क्षेत्रात आहे. त्यामुळे या स्थानी इको टुरिझमला वाव आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व वन विभागाला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. या दृष्टीने येथे विकास करणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलीच पावले उचलली जात नाही. दोन्ही तालुक्यांत अनेक पुरातन वास्तू व वारसे आहे. त्याच्याही जतन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काहींची तर साधी पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी नोंदसुद्धा नाही. आता याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.