सावली : सावली तालुक्यात १११ गावांचा समावेश असून, आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय अस्तित्त्वात आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात येतात, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसुतीचे रुग्णही याच रुग्णालयात येत असतात. परंतु मागील अनेक वर्षांपासून या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरच नाही. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या नावाने कोट्यवधीचा खर्च केला जात आहे, तर दुसरीकडे महिलांच्या आरोग्याकडे असे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सावली येथील ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळत आहे. स्त्रीरोग व प्रसुतीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्टरच रुग्णालयात नसल्याने पुरुष डॉक्टरांकडून प्रसुती केली जाते. यामुळे महिला संकोचतात. मग प्रसुतीच्या काळात हो - नाही परिस्थितीत एखाद्या महिलेला विलंब झाल्यास जीव गमावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रसुतीकरिता अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने काही वेळा तर प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना त्याच अवस्थेत ३० ते ३५ किमी अंतर असलेल्या गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. त्यामुळे नातेवाईकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. कधी कधी वाटेतच प्रसुती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जवळपास दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सावली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ महिला डॉक्टर नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.