ना नाले सफाई, ना पथदिवे दुरुस्त; सामान्यांचा वाली कोण?, ‘मनसे’चे महापालिकेसमोर आंदोलन
By साईनाथ कुचनकार | Published: October 18, 2023 05:44 PM2023-10-18T17:44:01+5:302023-10-18T17:44:48+5:30
अधिकाऱ्यांनी घेतली तातडीने बैठक
चंद्रपूर : महानगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकाल केव्हाच संपला आहे. परंतु अद्यापही निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर चंद्रपूर मनपा आयुक्तांची प्रशासक म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. मात्र, येथील अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याने शहरातील विविध कामांवर दुर्लक्ष तसेच समस्या वाढल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी आंदोलन करीत शहरातील समस्या सोडण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी सोशल मीडियावर प्रचलित मीम्सद्वारे ‘जल्दी वहासे हटो’ व इलेक्ट्राॅनिक्स भोंग्याचा वापर करून आंदोलन छेडण्यात आले.
वातानुकूलित कॅबिनच्या बाहेर निघण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना वेळ नाही. शहरात समस्या वाढल्या आहे, नाले सफाई, पथदिवे दुरुस्ती, पाणीपुरवठा, मोकाट जनावरे व कुत्रे, रस्त्यावरील खड्डे, अत्यावश्यक विकासकामे, नागरी आरोग्य, मनपा शालेय शिक्षण, शाळांची दुरवस्था, नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न आदी सर्व समस्या आहे. या समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे शहराध्यक्ष सचिन भोयर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेबाहेर मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मनपाचे उपायुक्त मंगेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून त्या पंधरा दिवसांमध्ये सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, कामगार जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, विधी विभाग जिल्हाध्यक्ष मंजू लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, शहर पदाधिकारी, युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांची उपस्थिती होती.