राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर नाही
सिंदेवाही : शहरातील चंद्रपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वाहतूक वाढल्याने, रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानक, शिवाजी चौक ते बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंत स्पीड ब्रेकरची गरज आहे. महाजन इंडियन गॅस एजन्सीजवळ नेहमीच अपघात होत आहेत. युवा पिढी वाहने सुसाट वेगाने चालवित आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
सावली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच सावलीतील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रबी पिकाची तयारी करीत आहे. अशा वेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कलावंतांना मानधनाची प्रतीक्षा
चंद्रपूर : साहित्यिक व कलावंतांना उतारवयात सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाकडून प्रतिमाह ठरावीक मानधन देण्यात येते; मात्र मागील तीन महिन्यांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे मानधन थकीत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे कोणतेही काम नाही.
वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी
चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने पाचवी ते १२वीपर्यंत वर्ग नियमित सुरू केले आहेत. मात्र वसतिगृह सुरू झाले नसल्याने विद्यार्थ्यांना राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरांना अडचण जात आहे.इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव
बंगाली कॅम्प परिसरात सुविधांचा अभाव
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. नाल्या न झाल्याने सांडपाणी तुुंबून राहते. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने या परिसरात सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.