राजेश माडुरवार
वढोली (चंद्रपूर) : एकीकडे शासन आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटींचे बजेट अर्थसंकल्पात घोषणा करतात. तरतुदी करतात; परंतु, चक्क रुग्णवाहिकेत डिझेल टाकण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिला तब्बल एक तास पेट्रोलपंपावर अडकली. हा संतापजनक प्रकार बुधवारी उघडकीस आल्याने तालुक्यातील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरत असतो. या आरोग्य केंद्रात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी असून त्यापैकी एक अधिकारी केव्हाच मुख्यालयी नसतो. चंद्रपूरवरून येणे- जाणे करत असतो. अशातच मंगळवारी धाबा येथील गर्भवती महिलेला त्रास जाणवायला लागला. प्रकृती गंभीर असल्याने योग्य उपचार व्हावा, यासाठी मोनिका रामदास तांगडपलेवार यांना चंद्रपूर रेफर करण्यात आले.
धाबा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका निघाली. गोंडपिपरी पेट्रोलपंपावर त्यांचा नियमित व्यवहार सुरू असतो. मात्र, डिझेलचे पैसे वेळेवर न मिळाल्याने उधार डिझेल टाकण्यासाठी पेट्रोलचालकाने नकार दिला. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तब्बल एक तास गर्भवती महिलेसह रुग्णवाहिका पेट्रोलपंपावर अडकून राहिली. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चकोले यांनी पैशांची व्यवस्था केल्यानंतर रुग्णवाहिका चंद्रपूरसाठी रवाना झाली.
निधी जातो कुठे?
जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध असताना रुग्णवाहिकेत डिझेलअभावी गर्भवती महिलेचा जीव आरोग्य विभागाने धोक्यात टाकल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारले असता आर्थिक व्यवहारासंबंधी कनिष्ठ लिपिक पद रिक्त असल्याने व पंचायत समितीस्तरावर बिल रखडले असल्याने हा प्रकार घडल्याची कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कर्तव्यावर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.