शिथिलता मिळताच ध्वनीप्रदूषणही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:49+5:30
जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगासोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगांतील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे अवाजवी आवाजाचा त्रासही वाढला आहे. आता हा त्रास ध्वनी प्रदूषण म्हणून समोर येत आहे. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हार्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. चित्रविचित्र हार्नमुळेही ध्वनी प्रदूषण वाढत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने प्रदूषण झपाट्याने कमी झाले होते. मात्र प्रशासनाने शिथिलता देताच वाहनांद्वारे चंद्रपुरात ध्वनी प्रदूषणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रदूषण आता नागरिकांच्या जिवावर उठेल की, काय असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगासोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगांतील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे अवाजवी आवाजाचा त्रासही वाढला आहे. आता हा त्रास ध्वनी प्रदूषण म्हणून समोर येत आहे.
अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हार्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. चित्रविचित्र हार्नमुळेही ध्वनी प्रदूषण वाढत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
नियमांची पुन्हा वाट
ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच जिल्हावासीयांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनी प्रदूषणाची भर पडत आहे.
आरोग्यावर परिणाम
दररोज लाखो वाहने रस्त्यांवरून धावत असतात. या वाहनांचा आणि त्यांच्या कर्नकर्कश हार्नचा आवाज नेहमीच कानात रेंगाळत असतो. याचाही आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. एकट्या चंद्रपूरची लोकसंख्या पाच लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्या वाढल्याने वाहनांची संख्या वाढत आहे.