आता एकाच संकेतस्थळावरून ताडोबासह सर्व व्याघ्र प्रकल्पांची सफारी बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:32 AM2023-09-22T11:32:49+5:302023-09-22T11:33:35+5:30
२३ सप्टेंबरपासून सुरू होणार नव्या प्रणालीद्वारे सफारी बुकिंग
चंद्रपूर : आता एकाच संकेतस्थळारून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग करता येणार आहे. यामुळे पर्यटकांची होणारी मोठी गैरसोय दूर होणार आहे. दि. २३ सप्टेंबरपासून या नव्या प्रणालीद्वारे व्याघ्र सफारी बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये कोणताही घोळ होण्याची शक्यता नसल्याचेही डाॅ. रामगावकर यांनी स्पष्ट केले.
‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट मायताडोबा डाॅट महाफाॅरेस्ट डाॅट जीओव्ही डाॅट इन’ या बेबसाइटद्वारे ही सफारी बुकिंग करता येणार आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी नॅशनल इन्फार्मेटिक सेंटरच्या माध्यमातून ही बुकिंग प्रणाली विकसित केलेली आहे. एसबीआय-ई पेमेंट-गेटवेसोबत ही प्रणाली जोडण्यात आली आहे. सध्या एसबीआय व इतर बँकांसाठी इंटरनेट बँकिंग हा पर्याय उपलब्ध आहे. गुगल पे, फोन पे आणि पेटीएमद्वारे सफारी बुकिंग सध्या उपलब्ध करण्यात आलेली नसली तरी पुढे जाऊन ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही डाॅ. रामगावकर यांनी सांगितले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी बुकिंगचा १२ कोटींचा घोळ पुढे आला. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहे. मात्र नव्या प्रणालीद्वारे सफारी बुकिंगमध्ये अफरातफर होण्याची शक्यता नसल्याचेही डाॅ. रामगावकर यांनी स्पष्ट केले.
३ ऑगस्ट पूर्वीचे सफारी बुकिंग वैध
कोअर क्षेत्रात पर्यटनासाठी उपलब्ध असलेल्या कॅन्टर वाहनाची बुकिंग मूल मार्गावरील वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालयातून दि. २५ सप्टेंबरपासून सकाळी ११ ते २ व दुपारी ३ ते ५ या वेळेत करता येणार आहे. सफारी बुकिंग, वेबसाइटबाबत कोणतीही अडचण आल्यास ९५७९१६०७७८ या हेल्पलाइनवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधता येईल, अशी माहिती क्षेत्र संचालक डाॅ. रामगावकर यांनी दिली. ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत केलेले पूर्वीचे सफारी बुकिंग वैध मानले जाणार असल्याचेही डाॅ. रामगावकर यांनी सांगितले.