लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात परगावातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झालेत. मात्र प्रशासनाकडून चाचण्यांचा वेग तेवढाच दिसला. त्यामुळे नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमीच राहिली. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण १२ हजार ७९४ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी दोन हजार २३६ चाचण्या पॉझिटिव्ह निघाल्या.आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल,असे वाटले होते. परगावातून आलेल्या नागरिकांकडून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढविल्या जातील, असेही वाटले होते. मात्र चाचण्या पूर्वीसारख्याच होत राहिल्या.
१ नोव्हेंबरला जिल्ह्यात एक लाख २० हजार ९२४ चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. १९ नोव्हेंबरला एक लाख ३३ हजार ७१८ चाचण्या पूर्ण झाल्या. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण १२ हजार ७९४ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांपैकी २ हजार २३६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. कोरोना नियमांचे कुठेही गांभीर्याने पालन होताना दिसले नाही. आता दिवाळी आटोपली आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात टेस्टींगसाठी गर्दीनोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी कोविड टेस्टींग सेंटरमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही. या कालावधीत नागरिक दिवाळीच्या धामधूममध्ये होते. मात्र त्यानंतर थंडीची एक लाट आली. याशिवाय वातावरणात बदल घडून आला. त्यानंतर चाचण्या वाढल्या.
१४ नोव्हेंबरपासून कोविड टेस्टींग सेंटरमध्ये चाचण्यांसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतल्याने चाचण्यांची संख्या वाढली.