जिल्ह्यात संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:49 PM2019-07-30T23:49:12+5:302019-07-30T23:50:01+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. काही ठिकाणी पूलांना भेगा पडल्या. तालुकास्थळी जोडणारे रस्ते बंद झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली. राज्य परिवहन मंडळाला काही मार्गांवरील फेऱ्या बंद कराव्या लागल्या. जिल्ह्यात आज सरासरी ८७. ९ टक्के पावसाची नोंद झाली. सिंदेवाही तालुक्यात आज सर्वाधिक १३९.६ मिमी तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी ४४.५ मिमी पाऊस पडला. धान पिकासाठी हा पाऊस पुरेसा असल्याने उघडीप होताच रोवणीला मोठा वेग येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणीयोग्य पाऊस पडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दीर्घ उसंत घेतली. पुरेसा पाऊसच न आल्याने अंकूर करपण्याचा धोका निर्माण झाला होता. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तर अवसान गळाले. धान उत्पादनात पुढे असणाºया नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर पºहेच टाकले नव्हते. त्यामुळे भात शेतीचा हंगाम टळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले. परंतु, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात संततधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने उसंत दिल्यानंतर रोवणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, पावसामुळे सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील धनराज गुरनुले यांचे घर कोसळले तर सावली येथील देवराव शिंदे, परमानंद मडावी, गजानन सोनुले, दामोदर मोहुर्ले यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. गंगूबाई वनकर यांच्या घराची भिंत कोसळली. गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातही काही घरांचे नुकसान झाले. नाल्याला पूर आल्याने पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना ताटकळत राहावे लागले.
एसटीला दोन लाखांचे नुकसान
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चिमूर, हिंगणघाट, वर्धा, चिमूर, पिपरडा,सिंदेवाही, शिरपूर, तळोधी, पिपाळनेरी, भिसी, चिमूर नवरगाव मार्गावरील वाहतूक व्यवस्था मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे चिमूर आगाराला दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रिंतेश रामटेके यांनी ‘लोकमत’ ला दिली.
शासकीय कार्यालये ओस
चिमूर तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नागपूर, चंद्र्रपूर, वरोरा,सिंदेवाही, हिंगणघाट आदी शहरातून ये जा करतात. मात्र पावसाने प्रमुख मार्ग सोमवारी रात्रीपासूनच बंद झाले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाविना शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांनीही शेतीची कामे बंद ठेवली. दरम्यान, वाहनधारकांनी पुलावरून पाणी असताना वाहन टाकू नये, असे आवाहन तहसीलदार संजय नागतिलक यांनी केले.