मूल तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ३३ टक्के पाऊस
By admin | Published: August 28, 2014 11:42 PM2014-08-28T23:42:23+5:302014-08-28T23:42:23+5:30
मूल तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ३३ टक्के पाऊस झाला असून ५५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एक हजार ५१९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
मूल : मूल तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ३३ टक्के पाऊस झाला असून ५५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एक हजार ५१९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. शेतकऱ्यानी पैपै जमवून पाऊस येईल, या आशेने रोवलेल्या धानाची पिके पावसाअभावी करपायला लागली आहेत. शेतीला भेगा पडायला लागल्या असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. पावसाअभावी मूल तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरलेले आहे.
मूल तालुक्यात ११० गावांचा समावेश असून खरीप पिकाचे क्षेत्र २६ हजार २२८ हेक्टर आहे. यावर्षी एक हजार १३७ हेक्टर जमिनीवर धानाची पेरणी करण्यात आली. मात्र पावसाअभावी आॅगस्ट महिन्याच्या शेवटी फक्त ९७५ हेक्टर धानाची रोवणी करण्यात आली आहे. उर्वरित धानाचे पऱ्हे शेतात उभे असून पावसाअभावी शेतकऱ्यांनी रोवणीच न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. यावेळी रोवण्याचा खर्च न परवडणारा वाटल्याने २५८ हेक्टर आर जागेत काही शेतकऱ्यांनी ‘आवत्या’ टाकल्याचे दिसून येते. सोयाबीन एक हजार ३९६ हेक्टर, कापूस ९७ हेक्टर तर तूर ९७ हेक्टर जागेत लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला ४२.४० हेक्टर, तिळ २१ हेक्टर, पोपट व इतर कडधान्याचे १९ हेक्टर जागेत लावणी केली आहे. एकंदरीत १३ हजार २२२ हेक्टर जागेत पिकाची लागवड करण्यात आली आहे.
भाताचे मुख्य पीक असलेल्या मूल तालुक्यात मात्र निसर्गाने अवकृपा दाखविल्याने फक्त ९७५ हेक्टर जागेतच रोवणी करण्यात आली असल्याने धानाचे पीक मागील वर्षीच्या तुलनेत नक्कीच कमी येईल व धानाचे भाव जास्त राहतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रोवणी केल्यानंतर पावसानी दडी मारल्याने जमिनीला भेगा पडायला लागल्या आहेत. धानावर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाने तालुक्यात दोन किड सर्वेक्षकाची नियुक्ती केली असून ते शेताशेतात जाऊन पिकाची पाहणी करुन रोगाबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी ए.डी. आटे यांनी सांगितले. तसेच ४५ वनराई बंंधारे बांधून येणारे पाणी अडवून त्यापासून शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)