अगरबत्ती उत्पादनातून पोंभूर्ण्यातील ३०० महिलांना कायम रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:13 AM2019-02-23T00:13:34+5:302019-02-23T00:14:50+5:30
‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवसाय करणारी पहिली सहकारी संस्था, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवसाय करणारी पहिली सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय प्रकल्प, एमआयडीसी स्थापनेची मंजुरी हे महत्त्वाचे प्रकल्प या लहानशा तालुक्यात रोजगाराचे नवे दालन उपलब्ध करून देत असताना आता अगरबत्ती उत्पादनातून तब्बल ३०० महिलांना प्रत्यक्ष रोजगार देणारा प्रकल्प सुरू झाला आहे.
अगरबत्ती तयार करण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या आयटीसी या कंपनीच्या नामवंत ब्रँडच्या उत्पादनाला चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्याच्या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. चांदा ते बांदा या योजनेतून महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, आयटीसी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी राज्य शासन व आयटीसी यांच्यामध्ये यासंदर्भात सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाला गुरूवारी सायंकाळी पोंभुर्णा येथील किरण राईस मिलच्या आवारात आयोजित एका शानदार सोहळयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आयटीसी लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी रायवरम स्वत: उपस्थित होते.
५ कोटी ३४ लाख ९२ हजार अनुदान मंजूर
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूरच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या चांदा ते बांदा योजनेंतर्गत पोंभूर्णा येथे हा अगरबत्ती प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पाला प्रथम टप्प्यात ४ कोटी ६२ लाख ६७ हजार रुपये मंजूर झाले. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ७२ लाख २५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले. या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली असून महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूरचे भरीव सहकार्य मिळाले आहे.
या प्रकल्पामुळे पोंभूर्णा तालुक्याचे नाव भारतातल्या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रावर श्रद्धा आणि भक्तीने घेतले जाईल. ३०० महिलांना कायम रोजगार आणि आयटीसी या विख्यात कंपनीसोबत या परिसरातील गरीब आदिवासी जनतेचे कायमचे सख्य हे या कराराचे वैशिष्ट्य आहे
- सुधीर मुनगंटीवार, वित्त, नियोजन व वने मंत्री ((म.रा.)तथा पालकमंत्री चंद्रपूर