चंद्रपूर : महाप्रसादामधून होणारी विषबाधा रोखण्यासाठी आता गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आॅनलाईन परवाने देणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मिठाईमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मंडळांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास मंडळांना किमान एक लाखापर्यंत दंडही भरावा लागणार आहे.सणासुदीच्या दिवसांमध्ये दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. दुग्धजन्य पदार्थ लवकरच खराब होत असल्यामुळे त्या पदार्थापासून विषबाधा होण्याची शक्यता आहे. अशा घटनासमोर आल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रसाद वाटपावर आता लक्ष केंद्रीय करण्यात आले आहे. याकरीता गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे आवश्यक राहणार आहे.सणासुदीच्या दिवसामध्ये परराज्यातून खवा व दुग्धजन्य पदार्थ मागविले जातात. अशाप्रसंगी मिठाईमध्ये भेसळ करून विक्री करण्यात येते. या भेसळयुक्त मिठाईमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविण्याकरिता आता अन्न व औषध प्रशासनाकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना परवाना काढवे आवश्यक करण्यात आले आहे. याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावरुन आॅनलाईन परवाना काढण्याची सुविधा करण्यात आली आहे. अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत येणारा नियम व विधीनियम २०११ प्रमाणे संस्था व अन्न पदार्थ वितरण करण्याच्या प्रत्येकांना आता नोंदणी करणे बंधनकार आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख दंड करण्यात येईल अशी तरदूत अन्न सुरक्षा मानकामध्ये करण्यात आली आहे.प्रसादातून विषबाधा होऊ नये. यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहे. नोंदणी करताना या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
प्रसाद वाटपासाठी लागणार आता परवानगी
By admin | Published: August 27, 2014 11:24 PM