चंद्रपूर : सध्या नागरिक कोरोना दहशतीत आहे. त्यातच लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश जण बाहेर जाण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी काहींना बाहेर जावेच लागत आहे. बाहेरच्या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर-नागपूर रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
महापालिका हद्दीत पशुपालन करायचे असल्यास संबंधितांना परवानगी घ्यावी लागते. मात्र, महानगरात बहुतांश पशुपालकांकडे पशुपालनाचा परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे. गाय, म्हशी, शेळी, बैल, घोडे, गाढव आदी पाळीव जनावरांचे परवान्याविना पालन सुरु आहे. याकडे महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. नियमानुसार पशुपालन करताना चारा, पाणी, पशुंना ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था पशुपालकांना करावी लागते. मात्र शहरात बहुतांश पशुपालक जनावरे मोकाट सोडतात. त्यामुळे ही जनावरे रस्त्यावर, जंगल क्षेत्रात अथवा नागरी वस्त्यांमध्ये सर्रास संचार करीत आहे.
काही दिवसापूर्वीच हाेटल ट्रायस्टर जवळील रेल्वे रुळावर चार म्हशींचा कटून मृत्यू झाला होता. दरम्यान, एका म्हशीला वाचविण्यात प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना यश आले आहे. मात्र प्रत्येकवेळी हे शक्य नसल्यामुळे महापालिकेने पशुपालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
सायंकाळच्या वेळी मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ठिय्या असतो. विशेष म्हणजे, शहरातील काही रस्त्यांवरील पथदिवेही बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावर बसून असलेली जनावरे दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.