चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूगर्भात दुर्मिळ धातूंचा मौल्यवान खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:40 AM2021-07-22T10:40:16+5:302021-07-22T10:48:28+5:30
Chandrapur News भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. प्लॅटिनम, सोने आणि रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले.
नीलेश झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले. हे दुर्मिळ धातू बाहेर काढण्यासाठी यानंतर काहीही प्रयत्न झाले नाही. हे दुर्मिळ धातू आजही तसेच आहेत. हे धातू बाहेर काढले तर विकासात मैलाचा दगड ठरू शकेल, असा हा खनिजा असल्याचे संशोधकांचे मत आहे.
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. यावर एम. एल. डोरा, के. के. के. नायर आणि के. शशिधरण या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या त्रिकुटाने बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान सोने, प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम हे धातू पुरेशा प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली. जगभरात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातू चंद्रपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गोंडपिपरी तालुक्याच्या पोटात आहेत. ही बाब मागास अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीसाठी सुखावणारी होती. या संशोधनाने गोंडपिपरीच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले. आता विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा या परिसरातील जनतेला होती. मात्र याबाबत शासन यंत्रणेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने भूगर्भातील हा खजिना तसाच पडून आहे.
वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात गोंडपिपरी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वटराणा पट्ट्यात पाॅयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे तर पेंटालँडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या हेटी पट्ट्यात दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातूचे प्रमाण आढळून आले आहेत. वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक आहे.
एकदा वेधले होते लोकसभेचे लक्ष
हंसराज अहिर यांनी खासदार असताना लोकसभेत याकडे लक्ष वेधून संशोधनकार्य मंदगतीने सुरू आहे. संशोधनाचा निधी वाढवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.