उत्पादन खर्च वाढतोय हजारात, हमीभाव वाढतो रुपयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:16+5:302021-09-19T04:29:16+5:30
संदीप झाडे कूचना : केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला मागील वर्षापेक्षा प्रतिकिलो ४० पैसे वाढ म्हणजे ...
संदीप झाडे
कूचना : केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला मागील वर्षापेक्षा प्रतिकिलो ४० पैसे वाढ म्हणजे प्रतिक्विंटल ४० रुपये वाढ झाली असून, यावर्षी गव्हाचा भाव २,०१५ रुपये, तर हरभरा पिकाला प्रतिकिलो १.४० रुपये यानुसार प्रतिक्विंटल १४० रुपयांची वाढ झाली असून, आता ५,२३० रुपये हमीभाव असणार आहे.
दरवर्षी बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमती वाढत आहेत. त्याचबरोबर मजुरीही वाढत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. अशातच केंद्र सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर केला. ज्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्प प्रमाणात भाववाढ देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीभावात मात्र ४० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होत आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत, पेरणी, काढणी, नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने त्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर पडतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. हा खर्च हजाराच्या घरात मात्र पदरी पडते रुपयांच्या दरात. त्यामुळेच शेतीचा व्यवसाय नुकसानाचा होत असल्याचे म्हटले जात आहे. घरगुती वापरातील सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत, मात्र शेतमालाचे भाव हे अत्यल्प दराने वाढत आहेत.
कोट
सरकारने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी, पेट्रोल शंभरच्या पुढे, मात्र हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, हीच केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका दिसत आहे.
- प्रकाश निब्रड, शेतकरी, रा. पळसगाव, ता. भद्रावती
कोट
शेतकरी राबराब राबतो. तरीही शेतकऱ्यांचा जर उत्पादन खर्च निघत नसेल, त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नसेल तर हा हमीभाव काय कामाचा?
- कपिल रांगणकर, शेतकरी, राळेगाव, ता. भद्रावती