चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते जलमय, अनेक घरांत घुसले पाणी
By साईनाथ कुचनकार | Published: July 18, 2023 03:48 PM2023-07-18T15:48:37+5:302023-07-18T15:49:00+5:30
नागरिकांची उडाली तारांबळ
चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून, जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. काही नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी शिरले. विशेषत: सिस्टर कॉलनी, नगिनाबाग, आझाद बगिचा परिसर, सिटी शाळा परिसर, बंगाली कॅम्प, सरकार नगर परिसरातील रस्ते जलमय झाले होते.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे काही शेतांत पाणी साचले असून, मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने राजुरा-कवठाळा या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली.