अफरातफर प्रकरणी रेशन दुकनदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:56+5:302021-03-22T04:24:56+5:30
चंद्रपूर : गरीब तसेच गरजूंचे जगणे सुलभ व्हावे, त्यांची दोन वेळची चूल पेटावी यासाठी सरकारच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाच्या ...
चंद्रपूर : गरीब तसेच गरजूंचे जगणे सुलभ व्हावे, त्यांची दोन वेळची चूल पेटावी यासाठी सरकारच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबाना अत्यल्प दरात धान्य वितरित केले जाते. मात्र काही स्वस्त धान्य दुकानदार गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून त्यांच्यावर अन्याय करतात. असाच प्रकार दुर्गापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पदमापूर येथे उघडकीस आला असून, धान्याची अफरातफर प्रकरणी पुरवठा विभागाने केलेल्या तक्रारीनंतर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पदमापूर येथे विलास देवीदास गौरकार यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. मात्र मागील महिन्यात लाभार्थ्यांना धान्य वितरण केले नाही. याप्रकरणी काही लाभार्थ्यांनी येथील पुरवठा विभागामध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे तसेच पुरवठा निरीक्षक प्रितम पवार यांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये गहू, तांदूळ तसेच साखर लाभार्थ्यांना वितरित न करता अफरातफर केल्याचे त्यांना आढळले. याप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर स्वस्त धान्य दुकानदार विलास गौरकार यांच्यावर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे. या घटनेनंतर अन्य स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.