ढिगाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:47+5:302021-06-04T04:21:47+5:30
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. ...
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्य प्राण्यांचा या ठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहे.
केरोसीनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा
राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती नगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल.
राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय
जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले
पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अनेक छोटे-मोठे धंदे बंद पडले. मजुरांची रोजी बंद आहे. एकेकाळी ९० रुपयाला मिळणारे तेलाचे पाकीट १५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचण होत आहे.
वाहनावर मोबाईलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेक जण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. संचारबंदी असल्याने रस्त्यावर वाहनाची गर्दी कमी प्रमाणात दिसून येते. मात्र युवक दुचाकीवर मोबाईलद्वारे बोलत वाहन चालवितात.
माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात आहे. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मागील काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.