ऐन सणात लाल परी रुसली, प्रवाशांचे हाल, एसटीचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:38+5:30
किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: नागपूर, तसेच इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसामध्ये प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. दरम्यान, खासगी वाहनांचा प्रवाशांना आधार घ्यावा लागत असून, यामध्ये त्यांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे, तर महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, घरभाडे, बोनस आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागणीवर अद्यापही शासकीय स्तरावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून संप सुरूच आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. त्यातच सुटी आणि कामाचे तास यामध्येही त्यांना त्रास होतो. त्यामुळे कुटुंब चालविणे, तसेच कुटुंबाकडे लक्ष देणे कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे.
किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: नागपूर, तसेच इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
अग्रीमपासून वंचित
दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना बोनससह अग्रीमचे दहा हजार रुपये दिले जातात. यावर्षी अग्रीमची रक्कम मिळाली नाही. एसटीतील कर्मचाऱ्यांना केवळ अडीच हजार बोनस दिला जातो. मागील वर्षी तोही देण्यात आला नाही. आधीच वेतन कमी, त्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अग्रिमची रक्कमही हाती आली नाही.
खासगी वाहतूकदारांची मनमर्जी
ऐन दिवाळीच्या दिवसांतच एसटीने संप पुकारल्यामुळे खासगी वाहतूकदारांना चांगले दिवस आले आहेत. प्रवाशांना नाइलाजाने ट्रॅॅव्हल्ससह अन्य वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.