सरपंचपदासाठी निर्वाचित उमेदवारांची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:10+5:302021-02-10T04:28:10+5:30
विशेष म्हणजे काँग्रेस, भाजप आदी पक्षांतर्गत सरपंचपदाची चढाओढ सुरू झाली असून आपलाच सरपंच कसा बसविता येईल, यासाठी ...
विशेष म्हणजे काँग्रेस, भाजप आदी पक्षांतर्गत सरपंचपदाची चढाओढ सुरू झाली असून आपलाच सरपंच कसा बसविता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरपंचपदाचे आरक्षण सोडत झाल्यापासून अशा कामांना वेग आल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने कालावधी संपलेल्या ग्रामपंचायत निवड़णुकांचा कार्यक्रम हाती घेतला आणि निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. प्रमुख राजकीय पक्षांतर्गत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून निर्वाचित उमेदवारांना पळविण्याचे काम सुरू झाले आहे. अनेकांनी गावविकास आघाडी तयार करून निवडणुकीच्या रणांगणात भाग घेऊन आपापले उमेदवार निवडून आणल्यानंतर ते राजकीय प्रवाहात विलीन होऊन सरपंचसारख्या प्रमुखपदी विराजमान होण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षाशी हातमिळवणी करीत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या पक्षाचे किती सरपंच होतील, हे जरी गुलदस्त्यात असले तरी मागील निवङणुकीचा मागोवा घेतल्यास काँग्रेसचे ३७, भाजप १२ तर रा.काँ.कडे ३ असे पक्षीय बलाबल होते. यात आता कसा फरक पडेल, हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.