गोंडपिपरी : सरपंचपद हे अतिशय महत्त्वपूर्ण पद आहे. गाव कारभारी म्हणून प्रचलित असलेल्या सरपंचपदाच्या अधिकारांतून संपूर्ण ग्रामविकास साधणे शक्य आहे. ग्रामविकासाचा खरा कणा सरपंच आहे. प्रशासन व ग्राम विकास यातील महत्त्वपूर्ण दुवा आहे, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गोंडपिंपरी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे राजीवसिंह चंदेल, शंभुजी. येलेकर, तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोक रेचनकर, नगराध्यक्ष सपना साकलवार, श्रीनिवास कंदनुरीवार, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कमलेश निमगडे, मनोज नागापुरे, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, असलम शेख, गौतम झाडे, साईनाथ कोडापे, वासू नगारे विराजमान होते.
यावेळी राजुरा नगराध्यक्ष धोटे यांनी आदर्श सरपंचाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. राजीव सिंह चंदेल व अशोक रेचनकर यांनी सरपंचाचे अधिकार व गाव विकासासाठी त्याच्या जबाबदाऱ्या याचे महत्त्व पटवून दिले. गोंडपिपरी तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थित आघाड्यांचा विजय झाला आहे. २३ सरपंच व २८ उपसरपंच हे काँग्रेस समर्थित असल्याने हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. उर्वरित पक्षांनी केलेले दावे-प्रतिदावे हे फोल ठरले असल्याची टीकाही यावेळी आमदार धोटे यांनी केली.
यावेळी आमदार धोटे व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन फुलझेले, प्रास्ताविक शंभुजी येलेकर, तर आभार तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे यांनी मानले. याप्रसंगी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.