सात वर्षीय चिमुकली एकटीच निघाली मामाच्या गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:05+5:302021-02-22T04:17:05+5:30
देवाडा बुज : मामाच्या गावाला एकटीच पायी जात असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीला बेंबाळ चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या ...
देवाडा बुज : मामाच्या गावाला एकटीच पायी जात असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीला बेंबाळ चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या नातेवाइकांच्या सुपुर्द केले.
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील पौनी उर्फ पोर्णिमा दिलीप शेंडे ही सात वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी रस्त्याचे पायी जात होती. घरापासून १० कि.मी. पायी अंतर कापून ती नवीन दिघोरी येथील बसथांब्यावर पोहोचली. या चिमुकलीसोबत कोणीही नसल्याचे पाहून काही सूज्ञ नागरिकांनी ही बाब मूल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीतील पोलिसांना कळविली. पोलिसांनी ताबडतोड बसथांबा गाठून त्या चिमुकलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, ती गडचिरोली तालुक्यातील मूलचेरा येथे मामाकडे जाण्यासाठी निघाली असल्याचे कळले. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. अधिक माहिती घेतली असता, पौनी ही मामाकडे राहात होती. मध्यंतरी ती आपल्या आई-वडिलाकडे गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे आली होती. मात्र, तिला येथे करमत नसल्याने ती एकटीच कुणालाही न सांगता पायी मामाच्या गावाला निघाली होती. या चिमुकलीला बेंबाळचे पोलीस कर्मचारी आनंद तितिरमारे व अन्य कर्मचाऱ्यांनी पौनीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.