मुख्यालयातील जनतेला स्वच्छ आणि सुंदर पाणी मिळावे म्हणून वाॅटर एटीएमची व्यवस्था करण्यात आली. मात्र सहा महिन्यांपासून वाॅटर एटीएमची सेवा बंद असल्याने स्वच्छ आणि सुंदर पाण्यापासून जनतेला वंचित रहावे लागत आहे.
उलट खासगी आरओच्या माध्यमातून छुप्या मार्गाने ठंड पाण्याची विक्री केली जात असल्याचा अप्रकार सुरु आहे. शासकीय पाण्याची जलसेवा बंद असताना खासगीरित्या पाणी वितरित करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. सावली नगरपंचायत अंतर्गत सावली नगरात शुद्ध पाण्याच्या सोयीकरिता २५ लाख रुपये खर्च करून दोन वाॅटर एटीएमची निर्मिती करण्यात आली. परंतु मागील सहा महिन्यांपासून दोन्ही वाॅटर एटीएम बंद स्थितीत असून याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लाखोंचा निधी व्यर्थ जाण्याची शक्यता आहे.
शुद्ध पाणी पिणे प्रत्येकाचा अधिकार आहे. यातच बॉटलचे महागडे पाणी घेणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य नाही. यावर तोडगा काढण्यासाठी वॉटर एटीएम ही संकल्पना उदयास आली. या वॉटर एटीएमची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपंचायतची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने एकाच वर्षात २५ लाख रुपये पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने त्वरित दोन्ही वाॅटर एटीएम सुरू करण्याची मागणी सावलीकरांकडून होत आहे.