चंद्रपूर : दिवाळीत फटाके फोडण्यावर लोकांचा जोर असतो मात्र, योग्य ती खबरदारी न बाळगल्याने अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागते. कोरपना तालुक्यातील पारधीगुडामध्येही सुतळी बॉम्ब फोडताना हलगर्जीपणामुळे अपघात घडून सहाजण जखमी झाले.
ही घटना बुधवारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली असून यात रमेश पवार (४२), धनराज शेरकुरे (३५), अनिल शेरकुरे (२८) याच्या हाता-पायाला गंभीर इजा पोहचली. तर उमेश काळे (३५), रमेश शेरकुरे (१८), लहू काळे (२२) रा. पारधीगुडा हे किरकोळ जखमी झाले.
पारधीगुडा येथील चौकात काही व्यक्ती चव्वाअष्टा खेळत असताना नेताजी शेरकुरे नामक व्यक्ती प्लास्टिक पिशवीमध्ये चार सुतळी बॉम्ब घेऊन आला. त्यातून एक सुतळी बॉम्ब काढून त्याने लगतच फोडला. यावेळी त्याची ठिणगी उडून बाकीचे सर्व सुतळी बॉम्बही फुटले. अचानक घटलेल्या या घटनेमध्ये तेथे असणारे सहाजण जखमी झाले.
ग्रामस्थांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल केले. यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.