नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:26+5:302021-08-13T04:32:26+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ...

The snake is worshiped on Nagpanchami; Then why is he killed the other day? | नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

Next

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारीच असतात; परंतु त्यांच्या दंशामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. मात्र, विषारी साप प्राणघातक असतो. वन्यजीव संरक्षण संस्था, आरोग्य विभाग व वन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नागरिकांच्या मनातील गैरसमज अजूनही पूर्णत: दूर झालेले नाहीत. त्यासाठी प्रबोधनाचा रेटा वाढविणे हाच पर्याय असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

बॉक्स

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र

साप हे उंदीर, घूस अशा धान्याचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्यावे. निसर्गातील अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी सापांचे अस्तित्व टिकले पाहिजे, असे आवाहन चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयानेही केले आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

कोणताही साप जाणीवपूर्वक दंश करीत नाही. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी साप प्रतिकार करतो. डूख धरणे यासारख्या कल्पना चुकीच्या व अशास्त्रीय आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. नागपंचमीनिमित्त सापांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्यांना वाचविण्याचा संकल्प केल्यास हा सण अधिक आनंददायी होईल, असे मत चंद्रपूर येथील सर्पमित्र प्रवीण कडू यांनी व्यक्त केले.

विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे, पोवळा, चापडा.

बिनविषारी : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, पहाडी तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरिगेटेड कुकरी, वाळा, चंचू वाळा, डुरक्या घोणस, मांडूळ, रुका, खापरखवल्या, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या).

साप आढळला तर...

साप आढळला तर त्याला ठार न मारता सर्पमित्राला तत्काळ बोलवावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्पमित्र सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित सोडतात. दंश केलाच तर मानसिकदृष्ट्या खचू नये. त्या व्यक्तीला धीर द्यावा, स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णाला तत्काळ उपचारासाठी न्यावे. शासकीय रुग्णालयात यावर उपचार मोफत होतो. सर्पदंशावर परिणामकारक औषध फक्त प्रतिसर्पविषच (एएसव्ही) आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती सर्पमित्र प्रवीण कडू यांनी दिली.

Web Title: The snake is worshiped on Nagpanchami; Then why is he killed the other day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.