भद्रावतीत उभारला जाऊ शकतो सोलर पॉवर पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:24 AM2019-06-02T00:24:38+5:302019-06-02T00:25:20+5:30
सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.
सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनामध्ये ही योजना सामावून घेणे गरजेचे आहे. शाश्वत उर्जा निर्मितीचा प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून सौर उर्जा हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली व अद्यापपावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने पडित असलेली ११९३.२३ हेक्टर जमीन, आवश्यक असलेला सुर्यप्रकाश, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रिड, जवळूनच गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, काही अंतरावरच असलेली वर्धा नदी या सगळ्या बाबी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमेच्या गोष्टी आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुनाडा टोला, चारगाव, विंजासन, लोणार (रिठ), रूयाळ (रिठ) व चिरादेवी या गावातील ६६८ शेतकऱ्यांची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. गेल्या २४ वर्षापासून या जागेवर कोणताही प्रकल्प आलेला नाही. सौर उर्जा प्रकल्पाला लागणाºया तापमानाचा विचार केल्यास भद्रावतीचे तापमानही सातत्याने वाढत आहे. भद्रावती परिसरातील निप्पॉन डेन्रोच्या जागेएवढी जागा व इतर मुलभूत गोष्टी शासनाला शोधूनही सापडणार नाही. या ठिकाणी ‘सोलर पॉवर पार्क’ झाल्यास हा पार्क राज्यालाच नव्हे तर देशाला उजळण्याचे काम करेल.
सौर उर्जेबाबत शासनही गंभीर
स्वत:च्या घरावर एक केव्हीचा घरगुती सौर उर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी शासन प्रोत्साहित करीत आहे. स्वत:ची वीज स्वत:च तयार करण्याकडे सध्या कल आहे. ज्या कोळशाच्या भरवश्यावर आज वीज निर्मिती होत आहे. त्या कोळसाच्या खाणी बंद पडल्याचे वास्तव आहे. नासाच्या वतीने अंतरिक्षात सौर उर्जा केंद्र स्थापन करून सुक्ष्म लहरीद्वारे सौर उर्जा पृथ्वीवर आणून तिचा वापर करण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे, हे विशेष.
सौर ऊर्जा ही नैसर्गिक व स्वच्छ ऊर्जा आहे. आज या ऊर्जेची गरज आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी मुलभूत गोष्टी व पुरेशी जागा उपलब्ध असल्याने शासनाने सोलर पॉवर पॉर्कसाठी विचार करावा. कोळसा आधारित ऊर्जा केंद्रापेक्षा सौर उर्जा ही पर्यावरण पुरक असल्याने अशा प्रकारचे केंद्र या ठिकाणी उभारण्यात यावे.
-सुरेश चोपणे
अध्यक्ष ग्रिन प्लॅननेट सोसायटी, चंद्रपूर.
सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले जात आहे. वाढत्या विजेला व संपणाºया कोळशाला गांभीर्याने घेणे आवश्यक असून सौर उर्जा हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी येथील प्रशासनाने पठापुरावा करणे व शासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. असे झाल्यास पर्यायाने भद्रावतीचाही सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणात विकास होईल. या क्षेत्रात निरनिराळे प्रकल्प येणार असे सांगण्यात आले. वास्तव काय आहे ते काळच सांगेल.