घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे ग्रहण सुटेना !

By Admin | Published: May 4, 2017 12:36 AM2017-05-04T00:36:06+5:302017-05-04T00:36:06+5:30

घनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते.

Solutane management project eclipse! | घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे ग्रहण सुटेना !

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे ग्रहण सुटेना !

googlenewsNext

रवी जवळे चंद्रपूर
घनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. घनकचऱ्यापासून प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव चंद्रपूर मनपाने अनेक वर्षांपूर्वी म्हणजे चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात होती, तेव्हाच तयार केला. मात्र अद्यापही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहू शकला नाही. मागील वर्षीपासून घराघरातून कचरा तर संकलित होत आहे. मात्र कुठलाही प्रकल्प सुरू नसल्याने अनेक वर्षांपासूनचा लाखो टन कचरा डम्पींग यार्डमध्ये अस्ताव्यस्त पडला आहे. या डम्पींग यार्डला अनेक वेळा आगी लागून आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपुरातील प्रदूषण आणखी वाढत आहे.
शहराचे सौंदर्य कायम रहावे व शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रत्येक शहरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन महत्वाचे मानले जाते. मात्र चंद्रपूरसारख्या महानगरात कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. २००६ पूर्वीच घनकचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या समस्याची पालिकेला जाणीव झाली. मात्र आज ११ वर्षानंतरही यावर रामबाण उपाय मिळाला नाही. जिल्ह्यातील इतर नगरपालिका क्षेत्रातही याहून वेगळी स्थिती नाही. त्यामुळे आधीच प्रदूषणामुळे कोमेजलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या माथ्यावर पुन्हा धनकचऱ्याची ‘घाण’ टाकून स्थानिक स्वराज्य संस्था साथीचे आजार पसरविण्यात हातभारच लावत आहेत.
चंद्रपूर शहरात २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर शहर विकासात आणि शहराच्या एकूणच चेहऱ्यात आमुलाग्र बदल होतील, अशी चंद्रपूरकरांना अपेक्षा होती. मागील पाच वर्षात काही विकास कामे मार्गी लागले आहेत. शहराचा चेहरामोहराही बदलत चालला आहे. मात्र घनकचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट होऊ शकली नाही.
चंद्रपूर शहरात दररोज ७० ते ८० टन कचरा निघतो. बायपास मार्गावर असलेल्या डंम्पींग यार्डमध्ये हा कचरा जमा केला जातो. घराघरातून कचरा संकलित करण्याची योजना मागील वर्षीपासून अमलात आणली आहे. सुखा आणि ओला कचरा संकलित केला जात आहे. त्यामुळे पूर्वी शहरातील रस्त्यारस्त्यावर पडून असलेला कचरा व घाण आता फारच कमी दृष्टीस पडते. यामुळे निश्चितच शहराचे सौंदर्य वाढत आहे. मात्र हा संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. शहराला लागूनच असलेल्या बायपास मार्गावरील डम्पींग यार्डमध्ये हा लाखो टन कचरा टाकला जातो. २००६ पूर्वी बायपास मार्गावरील डंम्पींग यार्डमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शिवाय सरदार पटेल महाविद्यालयाजवळ बायोगॅस प्रकल्पही उभारला. मात्र या प्रकल्पातून कधीच वीज निर्मिती होऊ शकली नाही.
त्यानंतर डम्पींग यार्डमधील कचऱ्याच्या माध्यमातून एखादा प्रकल्प उभा राहवा, असा इच्छा बाळगत मनपाने निविदा काढल्या. घनकचरा व्यवस्थापनाची ही प्रक्रिया महागडी असून यातून उत्पन्न निघणार नाही, या विचित्र हेतूने याकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही. मध्यंतरी नागपूर येथील एका कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट देण्यात आले. ही कंपनी डम्पींग यार्ड परिसरातच प्रकल्प उभारणार होती. मात्र माशी कुठे शिंकली, कळलं नाही. मात्र या कंत्राटदारांनी प्रकल्प न उभारताच पळ काढला. तेव्हापासून या प्रकल्पाचे भिजत घोंगडे सुरू आहे. सध्या या डम्पींग यार्डमध्ये सुमारे अडीच-तीन लाख टन कचरा सैरावैरा पडून आहे. चंद्रपूरच्या बायपास मार्गावरील डम्पींग यार्डजवळून ये-जा करणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. चक्क परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांनाही या ठिकाणाहून बस गेली की नाकावर रुमाल ठेवावा लागतो. विशेष म्हणजे, चंद्रपूरचे प्रदूषण राज्यात कुप्रसिध्द आहे. आता पुन्हा या डम्पींग यार्डमुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात भर पडत आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांपुढे आव्हान
चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळून अंजली घोटेकर महापौर तर अनिल फुलझेले उपमहापौर झाले आहेत. ते ६ मे रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. चंद्रपुरात इतर समस्या आहेतच; पण घनकचरा व्यवस्थापनाची समस्या बिकट आहे. ही समस्या आजवर सुटू शकली नाही. त्यामुळे ही समस्या सोडविणे नव्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.

यार्डमध्ये नेहमी धगधगतेयं आग
येथील बायपास मार्गावर असलेल्या डम्पींग यार्डमध्ये लाखो टन कचरा पडून आहे. या डम्पींग यार्डला अनेकवेळा आग लागत असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरून प्रदूषणात आणखी वाढ होत आहे.

केवळ भद्रावतीत प्रकल्प
जिल्ह्यात केवळ भद्रावती नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्यातून प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून खत निर्मिती केली जाते. वरोरा, ब्रह्मपुरी, राजुरा, बल्लारपूर, मूल, गडचांदूर, चिमूर या नगरपालिका क्षेत्रात डम्पींग यार्ड असले तरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे या ठिकाणीही कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे हे डम्पींग यार्ड आता डासांचे उत्पत्ती केंद्र झाले आहे.

Web Title: Solutane management project eclipse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.