शेतपीक, फळे व भाजीपाला महोत्सवाला प्रारंभ
By admin | Published: May 23, 2014 11:47 PM2014-05-23T23:47:09+5:302014-05-23T23:47:09+5:30
शेतकर्यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल,
चंद्रपूर: शेतकर्यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याची मत पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. आज शुक्रवारी चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी प्रदर्शन व धान्य खरेदी-विक्री संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, कृषी सभापती अरुण निमजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव व आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होत्या. डॉ. दीकप म्हैसेकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होण्यासाठी एखादे ब्राँड कृषी विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येऊन त्या ब्राँडला चांगली बाजारपेठ निर्माण करणे व त्या मालामुळे शेतकर्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. या धान्य महोत्सवात जिल्ह्यातील शेतकर्यांनी ग्रामीण भागातून आणलेले धान्य, फळे व चांगल्या प्रतीचा भाजीपाला तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे १०० स्टॉल लावण्यात आले आहे. प्रदर्शनाचा चंद्रपूरच्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. डी.एल. जाधव यांनी केले. प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)