वनमहोत्सवाला आजपासून आनंदवनातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:34 PM2019-06-30T21:34:38+5:302019-06-30T21:35:09+5:30
लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वनमहोत्सव १ जुलै रोजी सुरू होत असून उर्वरित ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या वनमहोत्सवाचे उदघाटन आनंदवन येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वनमहोत्सव १ जुलै रोजी सुरू होत असून उर्वरित ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या वनमहोत्सवाचे उदघाटन आनंदवन येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री परिणय फुके उपस्थित राहणार आहेत. हवामानातील बदल व वैश्विक तापमानात झालेली वाढ या जागतिक समस्या असून यामुळे महाराष्ट्रसुद्धा होरपळत आहे. यामुळे राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. ही बाब हेरून राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६ या वर्षापासून हरित महाराष्ट्र अभियान सुरू केले. त्याअंतर्गत २०१६ साली दोन कोटी वृक्षांची तर २०१७ साली चार कोटी व २०१८ साली १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याने ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले असून उर्वरित ३३ कोटी वृक्षांची लागवड करणे अजूनही शिल्लक आहे. हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टे ठरवून दिलेले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने एक कोटी ६७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे.
हा वनमहोत्सव १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान राबवल्या जाणार आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमली असून या समितीचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार तर सचिव म्हणून चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी एस. एल. सोनकुसरे आहेत. या समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातल्या सर्व विभागांच्या कार्यालयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
यामध्ये वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ, आदिवासी विभागचे प्रकल्प कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय, कृषी विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत इ. कार्यालयांचा यात समावेश आहे. अशा शासनाच्या विविध विभागांमार्फत खोदलेल्या खड्ड्यांची माहिती आॅनलाईन प्रणालीत अपलोड केलेली असून त्यानुसार रोपांची मागणी करण्यात आलेली आहे.
असा असेल कार्यक्रम
१ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात येईल. सकाळी १० वाजता उपस्थित मान्यवर श्रद्धेय बाबा आमटे यांच्या समाधीला भेट देऊन अभिवादन करतील. १०.३२ वाजता वन विभागाचे मुख्य सचिव कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करतील. त्यानंतर प्रशंसनीय कार्य करणाऱ्या वन विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. १०.४५ वाजता ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या चित्रफीतीचे तसेच पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांची भाषणे होतील.