भाजपा युवा मोर्चा ; तहसीलदारांना निवेदन
फोटो : तहसीलदारांना निवेदन देताना शिष्टमंडळ.
कोरपना : शासनाने प्रत्येक बाजार समिती क्षेत्रातील जिनिंगला कापूस गाडी खाली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मजुरी घेऊ नये, असे निर्देश दिले आहे. मात्र त्याची सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. ही लूट थांबण्यात यावी, यासंदर्भातील निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे कोरपना तहसीलदारांना देण्यात आले.
अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. कोरपना तालुक्यात कापूस खरेदी होत असलेल्या प्रत्येक जीनिंगवर गाडी खाली करण्यासाठी सर्रास मजुरी घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे. त्यामुळे ही लूट तातडीने थांबवावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे. याबाबत महाप्रबंधक भारतीय कपास निगम लिमिटेड यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भाजपा युवा जिल्हा मोर्चा जिल्हा सचिव ओम पवार, दिनेश सुर, नगरसेवक अमोल आसेकर, दिनेश खडसे, गजानन भोंगळे, नैनेश आत्राम, अभय डोहे, कार्तिक गोनलावार आदी उपस्थित होते.