चंद्रपूर : पोस्टमन येतो पत्रांचे ढीग पुढे करतो आणि निघून जातो. एक पाकिट उघडले जाते. त्यामध्ये राखी असते. पुढचे पाकिट पुन्हा राखीचेच. असेच एक दोन दिवस नाही तर संपूर्ण आठवडाभर पोस्टमन पाकिट घेऊन येतो आणि यामध्ये फक्त राखीच बघायला मिळते. यामुळे संपूर्ण कार्यालय आश्चर्यचकीत होते. हे दृश्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयातील नसून ते येथील प्रशासकीय कार्यालयातील आहे.ऐरवी प्रशासन म्हणजे, सरकारी खाक्या अशी काहीशी मानसिकता झाली आहे. मात्र यातच सुखद धक्का देण्याऱ्या काही गोष्टीही घडतात. अशी राख्यांची गोष्ट येथील उपविभागीय कार्यालयात घडली. तरुण असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे या भाऊरायांसाठी जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर प्रकल्पातील आदिवासी समाजातील एक दोन नाही तर शेकडो बहिणींनी त्यांना राखी पाठवूल खऱ्या अर्थाने भाऊ-बहिणींचे नाते जपले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र अनेकवेळा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहचतच नाही किंवा काही कारणांमुळे त्याचा लाभ मिळत नाही. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून घुगे यांनी पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुर्गम भागातील आदिवासींना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. विशेषत: त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. एवढेच नाही तर अधिकारी आणि नागरिक यांच्यातील दरी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातूनच दुर्गम भागातील नागरिकांसोबत त्यांची नाड जुडली. यातूनच गावागावात शेकडो बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत. मानलेले का असेना पण भाऊ-बहिणींचे नाते कायम राहावे, यासाठी चंद्रपूर प्रकल्पातील अनेक गावातील बहिणींनी त्यांना राख्या पाठवून भाऊ-बहिणींचे प्रेम वृद्धींगत केले आहे.
प्रशासकीय काम करताना अनेकांसोबत संपर्क येतो. यातून जिल्ह्यातील अनेक बहिणींनी राखी पाठवून केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने कामाची पोहच दिली आहे. आदिवासी बहिणींनी पाठविलेल्या या राख्यांतून बहिणी भावाचे हे नाते अधिक घट्ट केले आहे.-रोहन घुगेसहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कार्यालय, चंद्रपूर