शासकीय कामात असलेली आरोग्यसेविका निलंबित
By admin | Published: August 28, 2014 11:42 PM2014-08-28T23:42:40+5:302014-08-28T23:42:40+5:30
घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नकोडा उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता गेली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी
घुग्घूस : घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नकोडा उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता गेली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अकस्मात प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि गैरहजर असल्याचा ठपका ठेवून सदर आरोग्य सेविकाला तात्काळ निलंबित केले. सदर कारवाई अन्यायकारक असून ती कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नकोडा आरोग्य उपकेंद्रात तारा गोपाला भोयर ही आरोग्यसेविका पदावर कार्यरत आहे. तिने १ आॅगस्टला सकाळी स्तनदा व गरोदर मातांसह अंगणवाड्यांना भेटी दिल्या. वी.सी.डी.सी. च्या मुलांना औषधांचे वाटप तथा त्याची उंची, वजन करुन दुपारी १.३० वाजता उपकेंद्राची चावी मदतनिसाकडे देऊन जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता ती चंद्रपूरच्या पंजाब नॅशनल बँकेत गेली. याचवेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकाऱ्यांनी नकोडा गावाचा आकस्मात दौरा करुन भेट दिली. त्यांना आरोग्य उपकेंद्राला कुलूप दिसले. विशेष म्हणजे तारा भोयर हिचा या कोणताही दोष नाही. मदतनिसाला याबाबत संपूर्ण कल्पना होती. मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यांनी कोणतीही चौकशी न करता तात्काळ तारा भोयर हिच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई कर्तव्यावर असताना करण्यात आली असून निलंबनाची कारवाई त्वरीत मागे घ्यावी, अशी विनंती जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)