लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : नोकरीची वाट कुठपर्यंत पाहायची, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढतच आहे. नोकरी मागणारा नाही तर देणारा बनायचे, असा ठाम निश्चय करून विसापूर येथील दोन युवा इंजिनियर्सने गडचांदूर येथे चहाचे दुकान सुरू केले व आता चहा विकू लागले आहेत. राकेश टोंगे हा मेकॅनिकल तर आशिष रोगे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. दोघांनीही बऱ्याच नोकरीचा शोध घेतला. एकाला पुणे येथे जॉब मिळाला परंतु तुटपुंज्या मिळकतीत जवळ किती ठेवायचे व घरी किती पाठवायचे? हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. आशिष हा नोकरी सोडून गावी परतला व आपल्या मित्राला थेट स्वतःच ब्रँडचा चहा विकायचा विचार दाखविला. मित्रसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.परंतु मित्राच्या दृढ संकल्पाला दाद देऊन त्याला मदत करायची त्याने ठरवले व गडचांदूर येथे त्या दोघांनी इंजिनियर्स चहा या नावाने दुकान सुरू केले व चहा विकू लागले. गडचांदूरकरसुद्धा मोठ्या चवीने त्यांच्या दुकानातील चहाचा आस्वाद घेऊ लागले आहे. नोकरीच्या शोधात राहायचे की स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली प्रगती साधायची, हा निर्णय आजच्या युवकांनी स्वतःला विचारावा. या दोन युवकांनी लोक काय म्हणतील, याचा विचार न करता परिस्थितीवर मात करायचे ठरवले व चहाचे दुकान थाटले. अशीच प्रेरणा घेऊन आजचा युवक उद्योजक व्हावा, अशी शिकवण या युवकांनी चहाचे दुकान सुरू करून इतर युवकांना दिली.