अखेर दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराचा मार्ग प्रशस्त, केंद्राची मंजूरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 10:59 AM2023-06-01T10:59:33+5:302023-06-01T11:11:25+5:30
३० लक्ष मेट्रिक टन कोळसा पुरवठ्याचे लक्ष्य
अजिंक्य वाघमारे
दुर्गापूर (चंद्रपूर) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, स्थायी समितीची दिल्ली येथे झालेल्या ७२ व्या बैठकीत दुर्गापूर खुल्या कोळसा खाण विस्ताराकरिता १२१.५८ हेक्टर वनजमीन वळविण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खाणीच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोळसा उत्पादनाची क्षमताही वाढणार आहे. येणाऱ्या वर्षात चंद्रपूर वीज केंद्राला ३० लक्ष मेट्रिक टन कोळसा पुरवठ्याचे लक्ष्य आहे. यासोबतच खाणीची १२ वर्षे कालमर्यादा वाढेल.
वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर खाण सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारी खाण आहे. हल्ली खाणीतून चंद्रपूर वीज केंद्राला वर्षाकाठी १४ ते १७ लक्ष मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला जात आहे. मात्र, या खाणीकडे कोळसा उत्खननाकरिता मर्यादित जागा असल्याने खाणीचे चार ते पाच वर्षे एवढेच आयुर्मान उरले होते. पुढे व्यवस्थापनापुढे विस्तारीकरणाचा प्रश्न उभा होता. त्यामुळे लगतची १२१.५८ हेक्टर वनजमीन मिळविणे हा एकच पर्याय उरला होता. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळेल, याकरिता वेकोलिचा खटाटोप सुरू होता. मात्र, वन आणि पर्यावरणाच्या जाचक अटी आड येत होत्या. दुर्गापूर कोळसा खाण येत्या काळात जमिनीअभावी बंद होण्याच्या मार्गावर होती. या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजुरीकरिता आटोकाट प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, पर्यावरण वन व हवामान बदल (वन्यजीव) मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ७२ वी बैठक दिल्लीत झाली. त्यात दुर्गापूर खुल्या कोळसा खाण विस्ताराच्या प्रस्तावावर विस्तृतपणे चर्चा झाली. चर्चेअखेर स्थायी समितीने काही अटींवर प्रस्तावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. वेकोलि चंद्रपूर क्षेत्र व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना यश आले.
१२१.५८ हेक्टर वनजमीन दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता वळविण्याच्या प्रस्तावाची शिफारस केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने नुकतीच केली आहे. लवकरच पुढील शासकीय कार्यवाही आटोपून सदर जमीन कोळसा उत्खननाकरिता वेकोलि दुर्गापूरकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
- संजय वैरागडे, मुख्य महाव्यवस्थापक, वेकोलि, चंद्रपूर क्षेत्र