...तर ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी; केवायसी विना ‘पीएम-किसान’निधी मिळणे मुश्कील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:33 AM2024-01-16T10:33:04+5:302024-01-16T10:33:57+5:30
‘पीएम-किसान’चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी ७० लाख होती.
चंद्रपूर : राज्यातील शेतकऱ्यांची ‘ ई-केवायसी ‘ करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
‘पीएम-किसान’चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी ७० लाख होती. परंतु, कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या ८४ लाखांवर नेली. कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या ई-केवायसी मोहिमेमुळे आतापर्यंत ८६.४८ लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले. ई-केवायसीसाठी ६ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात विशेष मोहीम सुरू आहे. कृषी आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना कृषी यंत्रणेला दिल्या होत्या.
प्रलंबित बाबींची पूर्तता करा
पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी. जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आवाहन चंद्रपूर कृषी विभागाने केले आहे.
अशी करा शेतशिवारातून ई-केवायसी
पहिल्यांदा पीएम किसान पीएमकिसानडॉटजीओव्हीडॉटइनच्या अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यात आधारकार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाका.
मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.