लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्यार फाऊंडेशनमध्ये सध्यास्थितीत ३२२ वर जखमी जनावरांवर उपचार सुरु आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने येथील सदस्यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या जनावरांची सेवा करताना कसरत करावी लागत असल्याने समाजातील नागरिकांनी जखमी जनावरांची सेवा करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन प्यार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.अपघातात जखमी किंवा इतर कारणाने जखमी झालेल्या जनावरांवर प्यार फाऊंडेशनच्या वतीने उपचार, देखभाल केली जात आहे. येथे शहरातील १५ ते २० च्या संख्येने विद्यार्थी आपली सेवा नि:शुल्क देत आहे. मात्र या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने ते परीक्षेत गुंतले आहे. त्यामुळे येथे असलेल्या जनावरांची देखभाल करताना संस्थाध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांच्यासह अन्य दोघांची बरीच तारांबळ उडत आहे. शासनाचे किंवा इतर कुठलेही अनुदान नसल्याने लोकसहभागातून ते या जखमी जनावरांची निगा राखत आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी या जखमी जनावरांची सेवा करण्यासाठी समोर येण्याची विनंती त्यांनी केली आहे.
औषधोपचारसह अन्य कामे- जखमी जनावरांना औषधोपचार, चारा टाकणे, श्वानांना दुध पाजणे, त्यांना फिरायला नेणे यासह स्वच्छता करण्याचे कामे विद्यार्थी दररोज येथे करीत आहेत.
परीक्षेसाठी गेले तरुण- प्यार फाऊंडेशनमध्ये १५ ते १८ विद्यार्थी नि:शुल्क सेवा देत जखमी जनावरांची देखभाल करीत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची परीक्षा सुरु असल्याने ते पेपर देण्यासाठी गेले आहे. त्यामुळे येथील संपूर्ण भार दोन ते तीन जणांवर आला आहे.